सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आज गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात १० जोडप्यांचे विवाह होणार आहेत. गुरुवारी टाकळीकर मंगल कार्यालयात दिवसभर विवाहाचे विधी होणार आहेत. तर सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आ.सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी, पुस्तके देण्यात येणार आहेत. सायंकाळी नवविवाहित जोडप्यांची जुळे सोलापूर परिसरातून वरातही काढण्यात येणार आहे. तसेच सोबत येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींकरिता सुग्रास भोजनाची सोय करण्यात आली आहे, असेही सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले.
या पत्रकार परिषदेस सदाशिव व्हनमाने, प्रा. देवेंद्र मदने, सिद्धारूढ बेडगनूर, अरविंद रावळ आदी उपस्थित होते.


























