सोलापूर : बुधवार पेठेतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, मिलिंद नगर आणि जय मल्हार चौक परिसरात खाज सुटलेल्या मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरातील प्लॉट क्रमांक १७ व १८ तसेच मिलिंद नगर परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यातील काही कुत्र्यांच्या अंगावर खाज सुटल्याने ते नागरिकांच्या घरांसमोर बसतात, तसेच घरातही शिरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कुत्र्यांच्या अंगावरील किटकांमुळे खाज, खरूज यांसारखे त्वचाविकार होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच हे किटक पिण्याच्या पाण्यात पडत असल्याने आरोग्यविषयक चिंता वाढली आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेच्या संबंधित विभागाला तातडीने कारवाईचे आदेश द्यावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी चंदनशिवे यांनी केली आहे.
——-
Post Views: 50