पंढरपूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी १५ जुलैपासून व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या आदेशाचे उल्लंघन करून कोणालाही व्हीआयपी दर्शन घडवुन आणल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत. त्यामुळे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात काही दलाल धनाढ्य भाविकांकडून पैसे घेऊन त्यांना व्हीआयपी दर्शन घडवून आणत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना त्यामुळे तासनतास रांगेत थांबावे लागते. या बरोबरच दर्शनरांग खोळांबल्यामुळे रांगेतील वृध्द,महिला तसेच लहानमुलांचे अतोनात हाल होतात. त्यामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
दरम्यान आषाढी यात्रे मध्ये होणारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देखील दर्शन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले आहे. मात्र तरी देखील काही दलाल मंडळींकडून वशिल्याचे दर्शन, व्हीआयपी दर्शन घडविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्हीआयपी दर्शनाला यात्रेच्या काळात चाप बसावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केलेले आहेत. दरम्यान कोणत्याही भाविकाने आमदार, खासदार, मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या शिफारसपत्रासह (लेटरपॅडसह) येऊन ही त्याला व्हीआयपी दर्शन देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दलाल किंवा इतर कोणतीही व्यक्ती नियमबाह्य पद्धतीने व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करताना आढळल्यास संबंधितांवर तातडीने फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.
——————-
चौकट : ( भरारी पथके नियुक्त करावीत )
व्हीआयपी दर्शनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर समितीने विशेष भरारी पथके नियुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत देखरेख ठेवावी, सूचनाही अशा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
Post Views: 16