अकलूज – पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा थेट परिणाम शेतीबरोबरच पशुधन आणि दूध व्यवसायावर होत आहे. अनेक भागांत जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही जाणवत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संघाचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, कार्यकारी संचालक रविराज इनामदार-देशमुख, सेक्रेटरी शामकांत घोडे यांच्यासह संघाचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खा. धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, कोरोना महामारीनंतरच्या काळात दूध व्यवसायासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. दूध संकलन, विक्री, बाजारपेठेतील बदल तसेच उत्पादन खर्चातील वाढ यामुळे दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम झाला. या कालखंडात दूध उत्पादकांबरोबरच दूध संघांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. संघांना मोठा तोटा सहन करावा लागला. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून संघाने विविध उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. दूध व्यवसायाला अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाने कंडेन्स मिल्क प्लांटची उभारणी सुरू केली आहे. या प्रकल्पामुळे दूध प्रक्रियेला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याबरोबरच दूध उत्पादक सभासदांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. भविष्यात या प्रकल्पाचा निश्चितच दूध उत्पादक सभासदांना फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संघाच्यावतीने विविध विभागातील दूध उत्पादक संस्था व सेंटरना पारितोषिक देण्यात आली. सर्वात जादा दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये मळोली दूध संस्था प्रथम, श्री शंकर दूध संस्था सदाशिवनग द्वितीय तर तृतीय कै.अरूणादेवी देसाई दूध संस्था चाकोरे, सर्वात जादा दूध पुरवठा करणाऱ्या सेंटरमध्ये प्रथम शिवामृत कोंडबावी, द्वितीय शिवामृत शिंदेवस्ती मांडवे, तृतीय श्रावणी जावळेवस्ती पिलीव, 1000 लि पेक्षा जादा दूध व जादा दर घेणाऱ्यांमध्ये प्रथम शिवामृत काळमवाडी, द्वितीय शिवामृत मोरोची, तृतीय शिवामृत देशमुखवस्ती इस्लामपूर यांनी पटकाविला. यावर्षीचा जनरल चॅम्पियनशिप पुरस्कार सिद्धनाथ दूध संस्था तामसिदवाडी यांनी पटकाविला.
सभेच्या प्रारंभी विविध दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली ठराव मांडण्यात आला. हा ठराव संचालक बाळासाहेब पराडे यांनी मांडला. सभेचे प्रास्ताविक संचालक हरिश्चंद्र मगर यांनी केले. सभेतील विविध विषयांचे वाचन कार्यकारी संचालक रविराज इनामदार-देशमुख यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.