सोलापूर : समाज मंदिराच्या गैरवापरासह अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत याप्रकरणी चौकशी करून एमआयएमच्या नगरसेविका वहिदाबानो शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी याकुब शेख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. १४ मधील सिद्धेश्वर पेठेतील किडवाई चौक परिसरातील महापालिकेच्या मालकीचे समाज मंदिर अनेक वर्षांपूर्वी कोणतीही कायदेशीर मंजुरी न घेता ‘भारतीय महिला विकास मंच मंडळ’ या खाजगी संस्थेकडे वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संस्थेत संबंधित नगरसेविका व त्यांच्या सख्ख्या बहिणीचा पदाधिकारी म्हणून सहभाग असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १० नुसार, महापालिकेच्या मालमत्ता अथवा करारांमध्ये लोकप्रतिनिधीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आर्थिक हितसंबंध असल्यास अपात्रतेची तरतूद आहे. स्वतःशी संबंधित संस्थेला महापालिकेची मालमत्ता देणे ही बाब बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.
२०२६ च्या निवडणूक अर्जात समाज मंदिरासंदर्भातील माहिती लपविल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांना समाज मंदिराच्या वापरापासून वंचित राहावे लागत आहे. समाज मंदिराचा ताबा तातडीने परत घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करावी व नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Post Views: 6