सोलापूर – जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आज सकाळी पंढरपूर पंचायत समितीस अचानक भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. ३१ मार्चच्या कामकाजाच्या धावपळीनंतरही सर्व कर्मचारी वेळेत उपस्थित असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान उपाध्यक्ष पवार यांनी आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या तयारीचा तसेच पंचायत समितीअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी त्यांचे स्वागत करून विभागातील उपक्रमांची माहिती दिली.
पंचायत समिती परिसरात राबविण्यात आलेल्या ‘क्लीन अँड ग्रीन’ उपक्रमाची पाहणी करताना परिसरातील स्वच्छता, हरितीकरण आणि वृक्षारोपण उपक्रमाचे उपाध्यक्ष पवार यांनी विशेष कौतुक केले. प्रशासनाने घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे परिसर सुशोभित झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विठ्ठल-रुक्मिणीचे घेतले दर्शन
पंढरपूर दौऱ्यादरम्यान उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन भगवान विठ्ठल व माता रुक्मिणीचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी त्यांचे महावस्त्र देऊन स्वागत केले.यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, पंचायत समितीचे अधीक्षक शहाजहान तांबोळी, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दडे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.या भेटीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार असून, आषाढी यात्रेच्या नियोजनालाही गती मिळणार असल्याचे चित्र आहे.


















