मुदखेड – शहरातील घरकुल योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अद्याप पहिला आर्थिक हप्ता मिळालेला नसल्यामुळे अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना तात्काळ पहिला आर्थिक हप्ता मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान अब्दुल मजीद यांनी नगर परिषदचे मुख्याधिकारी जगदीश दळवी यांची भेट घेत निवेदन सादर केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुदखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या घरकुल योजनेतून अनेक गरजू कुटुंबांना घर बांधण्यासाठी मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात पहिला आर्थिक हप्ता मिळण्यात मोठा विलंब होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरबांधणीसाठी केलेली तयारी रखडली असून त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत आहे.
घरकुल योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर उपलब्ध करून देण्याचा तिचा उद्देश आहे. मात्र पहिला हप्ता वेळेत न मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुदखेड शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना तात्काळ पहिला आर्थिक हप्ता मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास संबंधित लाभार्थ्यांसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मुदखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना (PMAY 2.0) अंतर्गत एकूण 392 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 177 लाभार्थ्यांचे पहिले हप्त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले असून 60 लाभार्थ्यांचे दुसऱ्या हप्त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.शासनाच्या नव्या धोरणानुसार आता हे निधी वितरण थेट PMAY Housing मंत्रालय मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT पद्धतीने) जमा करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधी तसेच नगरपरिषदेने लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणेसाठी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. परिणामी, आता लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यात मिळत असून यामुळे पारदर्शकता वाढली आहे तसेच निधी वितरण प्रक्रियेला गती मिळाली आहे.
नगरपरिषद भविष्यातही लाभार्थ्यांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहे.
जगदीश दळवी
मुख्याधिकारी
नगरपरिषद मुदखेड


















