सोलापूर : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेला मधुमेह हा गंभीर आजार असला, तरी त्याच्याशी घाबरून लढण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करून जगणे अधिक आवश्यक आहे, असा सल्ला प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ डॉ. विजय पनिकर यांनी दिला.
रविवारी , हिराचंद नेमचंद वासनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात महाराष्ट्र आरएसएसडीआय आणि डॉ. संतोष मोटे स्पेशालिटी डायबिटीस केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मधुमेहांशी हितगुज” या विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.मधुमेहाबाबत जनजागृती करणे आणि रुग्णांच्या मनातील शंका दूर करणे या उद्देशाने आयोजित कार्यक्रमास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात डॉ.पनिकर यांनी मधुमेहाची कारणे, लक्षणे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय आणि नियमित तपासण्यांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “मधुमेह पूर्णपणे बरा होणारा आजार नसला, तरी योग्य आहार, नियमित व्यायाम, औषधोपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने तो प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“मधुमेह तपासण्या संकट की संधी” या विषयावर बोलताना त्यांनी वेळेवर तपासण्या केल्यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येते आणि रुग्णाचे आयुष्य अधिक निरोगी राहते, असे सांगितले. त्यांनी संतुलित आहार, साखर व तेलकट पदार्थांचे कमी सेवन आणि दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमात ठाणे येथील केआयएमएस हॉस्पिटलचे डॉ. विजय नेगलुर, डॉ. निखिल नाशिककर, डॉ. संतोष मोटे, डॉ. सचिन मुळे, डॉ. राहुल मेडीदार आणि डॉ. संन्हिता वालावकर यांनीही सहभाग घेतला. त्यांनी औषधांचे योग्य सेवन, इन्सुलिनचा वापर, जीवनशैलीतील बदल तसेच मानसिक आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन करत उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
कार्यक्रमादरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी थेट संवाद साधत आपले अनुभव आणि अडचणी मांडल्या. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ मार्गदर्शनापुरता मर्यादित न राहता संवादात्मक व अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत कामतकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष मोटे यांनी केले.
औषधे जीवनाचा आधार
“मधुमेह हा अडथळा नाही, तर योग्य नियोजनाने सांभाळता येणारा साथीदार आहे. औषधे घेण्यास घाबरू नका; ती आपल्या जीवनाचा आधार ठरतात.”असे डॉ. विजय नेगलुर यांनी सांगितले.
व्यायाम महत्त्वाचा
“मधुमेहासाठी आहार हे बंधन नाही, तर समजून घेतलेली जीवनशैली आहे. व्यायाम शरीरासोबत मनासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.”असे डॉ. संतोष मोटे म्हणाले.

























