माढा : उपळाई खुर्द येथील विवाहिता भाग्यश्री रविंद्र क्षिरसागर वय ३६ राहते घरामध्ये विजेच्या तारेचा शॉक लागून मयत झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मयताचे भाऊ विशाल श्रीमंत गवळी रा. पेनुर ता मोहोळ यांनी माढा पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार मयताचे पती रवींद्र रोहिदास क्षीरसागर रा उपळाई खुर्द यांचे वरती घातपाताचा संशय व्यक्त केला असून तशी फिर्याद माढा पोलिसात २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपळाई खुर्द गावावरती शोककळा पसरली होती.
याबाबतची फिर्यादीनुसार सविस्तर हकीकत अशी की मयत, भाग्यश्री हिचे २०११ शिक्षक पती असलेले रवींद्र शिरसागर यांच्याशी लग्न झाले. मिरज चिपळूण आणि उपळाई बुद्रुक या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या पत्नीला वारंवार त्रास देत चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण केली माझे इतर बायकांबरोबर संबंध असून तू माझ्या घरी राहू नको असे म्हणत शारीरिक मानसिक त्रास दिला. जमीन खरेदीसाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी सातत्याने त्रास दिला जात होता.
दरम्यान २४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता राहते घरामध्ये निष्काळजीपणाने उघड्या ठेवलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून ती खाली पडली आणि डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला या प्रकारात मयताचे पती रवींद्र रोहिदास शिरसागर हेच जबाबदार असून घातपात असल्याचा संशय मयताचे भाऊ विशाल श्रीमंत गवळी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मयत भाग्यश्री ही नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून अनेक वेळा माहेरी येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मध्यस्तांच्यामार्फत त्रास करणार नाही या हमीवर तिला सासरी नांदायला पाठवणे अशा घटना घडलेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये मोहोळ पोलीस स्टेशन, महिला आयोग यांच्याकडे या अगोदरच तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान घटना समजतात पेनुर तालुका मोहोळ येथून मैताचे माहेरीकडील कुटुंबासह इतर नातेवाईक यांनी माढा पोलीस स्टेशन गाठले माढा ग्रामीण रुग्णालयांमध्ये मयताचे शवविच्छेदन न करता सोलापूर येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी ते सिविल हॉस्पिटल सोलापूरला नेले. गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही प्रेत सोलापुरातून आणणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने रात्री ११ वाजता गुन्हा दाखल झाला. यानंतर मयत भाग्यश्रीच्या प्रेतावरती उपळाई खुर्द येथे पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा माढा पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


























