सोलापूर, प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सोलापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे जतन, संवर्धन आणि त्यामागील माणसांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने इंटॅक (INTACH) सोलापूरच्या वतीने विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले. केवळ वास्तू पाहण्यापुरती मर्यादित न राहता, वस्तू, आठवणी, व्यक्ती आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून शहराच्या इतिहासाशी संवाद साधणारी ही वारसा फेरी ठरली.
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याने या वारसा फेरीचा प्रारंभ झाला. या प्रसंगी इंटॅक सोलापूरचे पदाधिकारी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. या वारसा फेरीची संकल्पना आणि संपूर्ण प्रवासाची माहिती प्रारंभी डॉ. सीमंतिनी चाफळकर यांनी उपस्थितांना दिली. एखाद्या शहराचा इतिहास हा केवळ किल्ले, वाडे, मंदिरे आणि वास्तूंमध्येच बंदिस्त नसतो; तर त्या शहराच्या सामूहिक स्मृती जपणाऱ्या वस्तू, संग्रह, संस्था आणि व्यक्तींच्या कार्यामध्येही तो तितक्याच समर्थपणे प्रतिबिंबित होत असतो, या व्यापक भूमिकेतून या हेरिटेज वॉकची आखणी करण्यात आली.
संगीताच्या सुरांनी जपलेला इतिहास : या वारसा फेरीतील पहिला महत्त्वाचा टप्पा होता श्री हिराचंद नेमचंद वाचनालय संचलित, श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय. काळाच्या पडद्याआड जात असलेल्या संगीतविश्वातील अमूल्य आठवणी, ध्वनिमुद्रिका आणि ग्रामोफोन यांच्या रूपाने जतन झालेला हा ठेवा पाहताना सहभागी इतिहासप्रेमींना एका वेगळ्याच सांस्कृतिक विश्वाची अनुभूती आली. या प्रसंगी इंटॅक सोलापूरचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, सहसमन्वयिका श्वेता कोठावळे आणि डॉ. सीमंतिनी चाफळकर यांच्या हस्ते या अनमोल वारशाचे जतन करणारे संग्रहक जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी या संग्रहाची निर्मिती, दुर्मीळ ध्वनिमुद्रिका मिळविण्यासाठी केलेला अथक प्रयत्न, ग्रामोफोन आणि इतर संगीतविषयक वस्तूंचे संकलन व जतन यासंदर्भात उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. या संग्रहालयात गेल्या अनेक दशकांपासून जतन करून ठेवण्यात आलेल्या हजारो जुन्या ध्वनिमुद्रिका, ग्रामोफोन आणि संगीताशी संबंधित दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहाचा प्रवास उपस्थितांनी जाणून घेतला. एका काळी घराघरांतून संगीताची दुनिया खुली करणाऱ्या ग्रामोफोनपासून आजच्या डिजिटल युगापर्यंतचा प्रवास या संग्रहातून जिवंतपणे अनुभवता आला.
ध्वनी हा क्षणभंगुर असतो; परंतु योग्य प्रकारे जतन केला तर तो काळाच्या सीमा ओलांडून एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडू शकतो. श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयातील संग्रह ही अशाच प्रकारच्या सांस्कृतिक स्मृतींची अमूल्य शिदोरी असल्याची भावना समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर यांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे काही जुन्या ध्वनिमुद्रिका प्रत्यक्ष ऐकविण्यात आल्याने उपस्थितांना भूतकाळातील संगीतविश्वाची जणू प्रत्यक्ष सफरच घडली.
रुग्णसेवेचा नऊ दशकांचा निःशब्द इतिहास : यानंतर वारसा फेरीने भावे रुग्णोपयोगी संग्रह या सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्थेकडे प्रस्थान केले. सर्वसाधारणपणे वारसा म्हटले की वास्तू, शिल्प, कलावस्तू किंवा पुरातन वस्तूंचा विचार केला जातो; मात्र समाजाच्या आरोग्यसेवेशी निगडित वस्तू आणि त्यामागे असलेली सेवाभावाची परंपराही शहराच्या सामाजिक इतिहासाचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीव या भेटीतून झाली. गेल्या नऊ दशकांहून अधिक काळापासून या संस्थेच्या माध्यमातून रुग्णसेवेला आवश्यक असलेल्या विविध वस्तू उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. आजच्या आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या युगात सहज उपलब्ध होणाऱ्या अनेक रुग्णोपयोगी वस्तू पूर्वीच्या काळात सर्वसामान्यांसाठी सहजसाध्य नव्हत्या. अशा काळात गरजू रुग्णांना आवश्यक साधने व वस्तू उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेने सामाजिक बांधिलकीतून केले.
या संस्थेचा इतिहास, कार्यपद्धती आणि रुग्णसेवेशी निगडित असलेला अमूल्य संग्रह याविषयी या वेळेस संस्थेचे अध्यक्ष श्री सत्यनारायण गुंडला, सेक्रेटरी श्री विनायक पालमुरे, सल्लागार श्री शंभूसिंह चौहान, विश्वस्त श्री सुनील माढेकर व श्री श्री करपे आदींनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. रुग्णसेवा ही केवळ वैद्यकीय उपचारांपुरती मर्यादित नसून गरजू व्यक्तीला उपचारासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे हीदेखील सामाजिक आरोग्यव्यवस्थेची महत्त्वपूर्ण कडी आहे, याचे प्रत्यंतर या भेटीतून आले.
इंटॅकच्या या उपक्रमातून वारशाची संकल्पना अधिक व्यापक अर्थाने समोर आली. ही वारसा फेरी म्हणजे केवळ भूतकाळाच्या वस्तू पाहण्याचा उपक्रम न राहता ‘वस्तूंमागील इतिहास आणि इतिहासामागील माणूस’ समजून घेण्याचा एक संवेदनशील प्रयत्न ठरला. या दृष्टिकोनातून इंटॅक सोलापूरने आयोजित केलेली ही हेरिटेज वॉक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.
या उपक्रमासाठी समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, सहसमन्वयिका श्वेता कोठावळे, डॉ. सीमंतिनी चाफळकर, आर्किटेक्ट पुष्पांजली काटीकर, नितीन अनवेकर, अच्युत काटीकर, प्रा. भीमाकोंडा पाटील, अतुल देशपांडे, सागरीका कोठावळे यांच्यासह अनेक इतिहासप्रेमी आणि वारसा संवर्धनाची आस्था असणारे नागरिक उपस्थितहोते.
*विशेष चौकट :*
*भुईकोट किल्ल्यावर तिरंग्याला सलामी :*
भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या
वतीने आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण सोहळ्यास इंटॅक सोलापूरचे सर्व पदाधिकारी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. तिरंग्याला मानवंदना देत सुरू झालेल्या या कार्यक्रमानंतरच हेरिटेज वॉकला प्रारंभ झाला. राष्ट्रस्वातंत्र्याच्या स्मृतींना अभिवादन आणि त्याचवेळी शहराच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा संकल्प, असा या उपक्रमाचा सुंदर संगम साधला गेला. स्वातंत्र्याचा इतिहास जपताना आपल्या शहराचा इतिहासही पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची जबाबदारी अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.
Post Views: 7