सोलापूर – होर्ती (ता. इंडी, जि. विजयपूर) येथील श्री रेवणसिध्देश्वर मंदिर परिसरातील शासकीय शाळेतील इयत्ता 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना आशालता जवळेकर आणि अशोककुमार जवळेकर यांच्या स्मरणार्थ बुधवार दि. 8 जुलै रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना वही व पेन देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अधिक उत्साह निर्माण होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शैक्षणिक साहित्य वाटपाबरोबरच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, वाचनाची सवय आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास जवळेकर कुटुंबीय, शिक्षकवृंद तसेच मुख्याध्यापक मिरगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. आशालता जवळेकर आणि अशोककुमार जवळेकर यांच्या स्मरणार्थ राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही स्वागत करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

















