सोलापूर – जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये रिक्त असलेली सेविका आणि मदतनीस पदे भरण्यास अखेर हिरवा कंदील मिळाला असून, २० जुलैपासून भरती प्रक्रियेला अधिकृत प्रारंभ होणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा (आय.सी.डी.एस) योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण विभागाने भरतीची सर्व तयारी पूर्ण केली असून, ६१ अंगणवाडी सेविका आणि ११५ अंगणवाडी मदतनीस अशी एकूण १७६ पदे भरली जाणार असल्याची माहिती जिल्हा
महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत अनेक अंगणवाडी केंद्रे सेविका व मदतनीसांच्या रिक्त पदांमुळे अपुऱ्या मनुष्यबळावर चालवावी लागत होती. याचा परिणाम बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण, लसीकरण समन्वय, तसेच गर्भवती व स्तनदा मातांना मिळणाऱ्या विविध सेवांवर होत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण विभागाकडून भरतीचे सविस्तर वेळापत्रक, पात्रतेचे निकष, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, जन्मतारीख, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तयारी आतापासूनच करून ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिकृत सूचना संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीकडे लक्ष न देता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या भरतीमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांतील मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच माता-बाल कल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पात्र महिलांसाठी शासकीय सेवेत सहभागी होण्याची ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. भरतीमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होणार असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास हातभार लागणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांमुळे बालक, गर्भवती व स्तनदा माता तसेच लाभार्थींना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
कोट
महिला व बालकल्याण विभागाकडून भरतीसंदर्भातील वेळापत्रक, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबतची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र महिला उमेदवारांनी संबंधित प्रकल्प कार्यालय तसेच जिल्हा परिषदेकडून प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांनुसार अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले आहे.