अकलूज – माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या दीड वर्षापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यांपासून वंचित असून, यामागे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ओबीसी सेलचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस विजय मंडलिक यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हप्ते गेल्या एक ते दीड वर्षांपासून बंद आहेत. तर काही पात्र शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा एक रुपयाही लाभ मिळालेला नाही. शेतकरी तहसील कार्यालयात गेल्यानंतर त्यांना कृषी कार्यालयाकडे पाठविले जाते, तर कृषी कार्यालयातही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
अनेक शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्रातून ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेक केंद्रांवर ही प्रक्रिया होत नसल्याचे सांगितले जाते. काही शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांच्या अर्जांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी शेतीची कामे सोडून वारंवार कृषी कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. तरीही संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पीएम किसान योजनेचे बंद झालेले हप्ते तातडीने पूर्ववत करून सर्व थकीत हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत, तसेच या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय मंडलिक यांनी केली आहे.
मागण्यांकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास, पीएम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.