सोलापूर – कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल झालेल्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी केलेल्या सुविधांचे नेटके नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात्रेच्या काळात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या कामाची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांचे व्यवस्थापन करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने विविध विभागांमध्ये समन्वय साधत यात्रेचे नियोजन केले. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या नियोजनाची आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा सन्मान केला. हा गौरव केवळ एका अधिकाऱ्याचा नसून यात्रेच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान मानला जात आहे. वारीच्या काळात लाखो भाविकांना सुविधा पुरविण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनासाठी हा गौरव निश्चितच प्रोत्साहन देणारा ठरला आहे.
Views: 11