धाराशिव : उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिक थंड पेयांकडे वळत असताना शहरातील काही किराणा दुकानदार ग्राहकांची सरळ लूट सुरू केल्याचे चित्र समोर आले आहे. २० रुपये एमआरपी असलेल्या थम्स अप, स्प्राईटसारख्या कोल्ड्रिंक्स बाटल्यांवर तब्बल ५ रुपये कूलिंग चार्ज’ लावून २५ रुपयांना विक्री केली जात आहे.
विशेष म्हणजे, एमआरपी (Maximum Retail Price) स्पष्टपणे २० रुपये असतानाही फ्रिजमध्ये थंड केलंय या कारणाखाली अतिरिक्त पैसे उकळले जात आहेत. काही ठिकाणी तर ग्राहकांनी विरोध केल्यास उडवाउडवीची उत्तरे देत सरळ नकार देण्याचे प्रकारही घडत आहेत.ग्राहक संघटनांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री करणे हा ग्राहक संरक्षण कायद्याचा सरळ भंग आहे. कूलिंग चार्ज’ नावाखाली पैसे घेणे पूर्णपणे बेकायदेशीर असून संबंधित दुकानदारांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली असून २० ची बाटली २५ ला का? असा सवाल विचारला जात आहे. प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई करून अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर ग्राहकांना लुटण्याचा हा प्रकार आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक नगरपालिकेने तातडीने तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

















