सोलापूर – खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव कृषी विभागाने उधळून लावला आहे. नामांकित कंपनीच्या उडीद बियाण्यांची हुबेहूब नक्कल करून बाजारात विक्रीसाठी आणलेले तब्बल ८ लाख ४६ हजार रुपयांचे बोगस बियाणे अक्कलकोट येथे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शेकडो शेतकरी आर्थिक फसवणुकीपासून वाचल्याची भावना व्यक्त होत आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मंगळवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास बोगस उडीद बियाणे विक्रीची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने तातडीने छापा टाकत मोठी कारवाई केली. शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या एन.यू. एल-७ (विश्वास) या उडीद वाणाच्या बॅगची बनावट प्रतिकृती तयार करून विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले.
छाप्यात स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रातून ४८ बॅग तर अक्कलकोट येथील आबा कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनमधून आणखी ४३२ बॅग जप्त करण्यात आल्या. प्रत्येकी ५ किलो वजनाच्या अशा एकूण ४८० बॅग जप्त करण्यात आल्या असून त्यांची बाजारमूल्य ८,४६,७२० रुपये इतकी आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आणि कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बी.बी. बाबर, अशोक कांबळे तसेच कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी वासुदेव नाटीकर यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
दरम्यान, जप्त बियाणे विक्रेत्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कृषी विभागाने बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Post Views: 35