सोलापूर – आजारपणाच्या उपचारासाठी खर्च केलेल्या पैशांची प्रतिपूर्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची तब्बल ८५० ते ९०० वैद्यकीय बिलांची प्रकरणे मागील तीन महिन्यांपासून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी वाढली असून, आठवडाभरात प्रलंबित फायलींवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे.
उपचारासाठी अनेक शिक्षकांनी कर्ज काढून खर्च भागविला आहे. मात्र, वैद्यकीय बिलांची रक्कम वेळेत मिळत नसल्याने कर्जावरील व्याजाचा बोजा वाढत आहे. यापूर्वी साधारण आठवडा ते पंधरा दिवसांत अभिप्राय देऊन शिक्षण विभागाकडे पाठविल्या जाणाऱ्या फायली आता तीन महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
या प्रश्नाबाबत शिक्षक संघाने २७ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही अपेक्षित गतीने कार्यवाही न झाल्याची टीका संघाचे कार्यकारी अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे यांनी केली.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभागाला दोन अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. प्रलंबित फायलींचा आठ दिवसांत ‘मिशन मोड’वर निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता आश्वासनाची अंमलबजावणी होऊन शिक्षकांना त्यांच्या वैद्यकीय खर्चाची रक्कम वेळेत मिळते का, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष रणजित थिटे, राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे महासचिव म. ज. मोरे, राज्य सेवानिवृत्त संघाचे कार्यकारी अध्यक्ष बब्ब्रुवाहन काशीद, सहसचिव श्रीकांत दळवी, उत्तर सोलापूरचे अध्यक्ष भाऊसाहेब घोडके, जिल्हा उपाध्यक्ष ईरण्णा मैंदर्गी, ईश्वर बिराजदार आदी उपस्थित होते.
कोट
३१ ऑगस्टपर्यंत निपटारा करणार
वैद्यकीय बिले मागील सात-आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. मी पदभार स्वीकारल्यानंतर सुमारे ३०० प्रकरणे निकाली काढली आहेत. सोमवारी एका दिवसात १५० फायलींचा निपटारा केला. अंदाज समितीच्या बैठकीमुळे काही दिवस वेळ जाणार असला तरी ३१ ऑगस्टपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन आहे.
डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी
Post Views: 7