सोलापूर – पावसाळ्यानंतर डेंग्यूचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू न देता आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र पुळुज अंतर्गत आंबे येथे संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित घरासह परिसराची पाहणी करून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
आंबे येथील पाहणीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सहसंचालक कुष्ठरोग डॉ. मोहन शेगर आणि सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी किरण मंजुळ उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी संशयित रुग्णाच्या घराची तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे तपासली.
घरातील पाणी साठ्यांची तपासणी महत्त्वाची
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी घरातील पाणी साठविणारी भांडी, टाक्या, डबे, कुंड्या तसेच इतर साहित्य नियमितपणे तपासणे गरजेचे आहे. साचलेले पाणी तातडीने रिकामे करावे किंवा पाणी साठविण्याची भांडी व्यवस्थित झाकून ठेवावीत. घराभोवती पाणी साचणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे आरोग्य विभागाने सांगितले.
आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून स्वच्छ करण्याची सवय नागरिकांनी लावावी. ‘कोरडा दिवस’ प्रभावीपणे राबविल्यास डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. कोपूरवाड यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आंबे येथील ३३० लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. यामध्ये हाऊस इंडेक्स ७.२, कंटेनर इंडेक्स ९.२ आणि ब्रेटो इंडेक्स ७.२ आढळून आला. त्यामुळे नागरिकांनी डेंग्यूबाबत अनावश्यक भीती न बाळगता प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे न घेता जवळच्या शासकीय दवाखान्यात किंवा आरोग्य उपकेंद्रात जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी समन्वयाने काम करून परिसरातील पाणी साठे नष्ट करणे, स्वच्छता राखणे आणि डेंग्यूविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या. पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.