सोलापूर – माझी वसुंधरा योजनेत प्रथम आणि तृतीय पुरस्कार मिळालेल्या मंद्रूप ग्रामपंचायतीकडून प्लास्टीक खुर्च्या व कचरा खुंडी खरेदी करून माझी वसुंधरा योजनेतील शासनाच्या नियमाला हरताळ फासण्यात आला आहे. या योजनेतील निधी खर्ची टाकून मार्चअखेर बिल काढण्यासाठी धावपळ सुरू असून कारवाई न करता बघ्याची भूमिका घेणार्या प्रशासनाची भूमिका गुलदस्त्यात आहे.
माझी वसुंधरा अभियानातून मंद्रूप ग्रामपंचायतला प्रथम व तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी ७५ लाख रुपये बक्षीस प्राप्त मिळाले आहेत. या रक्कमेतून पर्यावरण पूरक साहित्य खरेदी करून पर्यावरण संवर्धनाचे काम करणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीकडून प्लास्टिक खुर्ची व प्लास्टीक कचराकुंडीसह विविध साहित्य खरेदी करून माझी वसुंधरा अभियानाच्या पुरस्काराचे नियम पादळी तुडविण्यात आले आहेत.
शिवाय मंद्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग व प्लॅस्टिकचा वापर वाढला असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतीकडून माझी वसुंधरा योजनेतील रक्कम खर्ची टाकण्याचा प्रयत्न सुरू असून प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. एकीकडे याबाबत तक्रार करूनही पंचायत समिती कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही तर दुसरीकडे ग्रामसेवक दहा महिन्यापासुन पदभार न देता बिनदिक्कत रक्कम खर्ची टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नियमबाह्य कामाला प्रशासनाची संमती आहे का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज्य अभियानात मंद्रूप ग्रामपंचायतीचा सहभाग असून पुरस्कारासाठी निवड करताना माझी वसुंधराचा निधी खर्च करून पर्यावरणाचे नुकसान करणार्या प्लास्टीक वापराचाही तपासणी करण्यात यावे. तसेच शासनाचे नियम धाब्यावर बसवून प्लास्टीक साहित्य खरेदी करणार्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

















