सोलापूर : महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार करत सोलापूर महानगरपालिकेने कौन्सिल हॉल आवारात ‘हिरकणी कक्ष’ उभारला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी येणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सोलापूर महापालिकेत सध्या ५० टक्के महिला नगरसेविका कार्यरत आहेत. त्यामुळे महिला लोकप्रतिनिधींच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. महापालिका कौन्सिल हॉल आवारात सभागृह नेते कार्यालय शेजारी हा हिरकणी कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. सभांच्या काळात लहान बालकांसह येणाऱ्या महिला नगरसेविकांना याचा उपयोग होणार आहे. हिरकणी कक्षामध्ये आरामदायी आसनव्यवस्था, बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिला सन्मान, मातृत्वाचा आदर आणि लोकप्रतिनिधींना अधिक सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे वाढते प्रतिनिधित्व लक्षात घेता अशा सुविधांची गरज सातत्याने व्यक्त होत होती. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने हिरकणी कक्षाची उभारणी करून महिला लोकप्रतिनिधींसाठी संवेदनशील व सकारात्मक उपक्रम राबवल्याची भावना व्यक्त होत आहे.
Post Views: 9