सांगोला – देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्रातील एकमेव जि.प.शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या शेळकेवाडी (शिवणे ) जि.प.प्रा.शाळेचा पॅटर्न आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन करून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांच्या कामकाजाचे नियमित निरीक्षण करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा गौरव केला जाईल, तर ज्या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहे तेथे तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, प्रत्येक शाळा आदर्श आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच जिल्हा परिषदेची प्राथमिकता असल्याचे सोलापुर जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) येथील जि.प.प्रा.शाळेत जि.प.सोलापूरच्या शिक्षण व आरोग्य समितीची मासिक बैठक सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेळकेवाडी जि.प.शाळेच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीस सांगोला पं.स. सभापती पुनम इंगवले, उपसभापती अजय सरगर, शिक्षण समिती सदस्य दिपाली ताड, चंद्रकांत जाधव, वंदना कांबळे, श्रुती भोरगुंडे, माजी सभापती शिवाजी कांबळे, शिक्षणाधिकारी कादर शेख व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी, टाळ-मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात केलेल्या स्वागताने बैठकीला संस्कार आणि परंपरेची अनोखी जोड मिळाली.
चौकट-
बैठकीत कामकाजाचा सविस्तर आढावा घेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील शिक्षण विभागाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके, गणवेश, मुलींसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्ती व बांधकामांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. शालेय गणवेशासाठीचे अनुदान रु.३०० वरून ५०० करण्याचा ठराव तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यात रु.१ वरून ५ प्रतिदिन वाढ करण्यास समितीने मंजुरी दिली. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि माझी शाळा उपक्रमाचाही आढावा घेण्यात आला.
-चेतनसिंह केदार-सावंत, सभापती, सोलापुर जि.प.शिक्षण व आरोग्य समिती
Post Views: 7