बार्शी – राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आर्मी ड्रिल, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, अग्निवीर परीक्षेत यशस्वी झालेल्या कॅडेट्सचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विशेष शैक्षणिक भेटीमुळे हा सोहळा विशेष संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विजयनाना राऊत (नगरसेवक, बार्शी नगरपालिका), ॲड. अनिल पाटील आणि रावसाहेब यादव (उद्योजक, बार्शी) उपस्थित होते. तसेच सीमेवर कार्यरत असलेले अनेक जवान, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार आणि पालक संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व पाहुण्यांच्या स्वागताने झाली. स्वागतगीत व ड्रिलनंतर ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीताने संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला. त्यानंतर जिजाऊ गुरुकुलच्या कॅडेट्सनी सादर केलेल्या आर्मी ड्रिल व मानवंदनेने उपस्थितांची मने जिंकली.
गुणवंत विद्यार्थ्यांना सॅमसंग टॅबची भेट
जिजाऊ गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अध्यक्ष संभाजी घाडगे यांच्यावतीने इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सॅमसंग टॅब देऊन गौरविण्यात आले.
अग्निवीर यशस्वी कॅडेट्सचा गौरव
जिजाऊ गुरुकुलच्या अनेक कॅडेट्सनी अग्निवीर परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सैनिकी शिस्त, देशसेवेची भावना आणि ध्येयवादी वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या गुरुकुलच्या उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत शिस्त, संस्कार, मेहनत, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेम जोपासण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून जिजाऊ गुरुकुलचे तसेच आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम आणि फिजिकल कोच जे. बी. शिंदे मेजर यांच्यासह शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा मोटे, शिवराज चौगुले आणि पारस कांबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता भैरू जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.