बार्शी – लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी तथा पालखी सोहळा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा प्रतिष्ठेचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई मठात आषाढी एकादशीच्या महापर्वानिमित्त आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थानचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ अध्यात्मिक क्षेत्रात, विशेषतः आषाढी वारीच्या काळात वारीचे सातत्यपूर्ण वार्तांकन करुन भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारात योगदान देणाऱ्या राज्यातील एका पत्रकाराची दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड केली जाते. श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ व संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे शंकर टेमघरे, विलास काटे, राजेंद्रकृष्ण कापसे, औदुंबर भिसे, प्रा. किरण गाढवे, विकास भालके, सुधीर गुळमे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहकारी पत्रकार मित्र, कटुंबीय उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे म्हणाले, ज्या संत मुक्ताईने माऊलींना उपदेश केला, त्या मुक्ताईच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या महापर्वात, श्री संत मुक्ताबाई मठात आणि श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पवित्र भूमीत प्रदान होत आहे, याला विशेष महत्त्व आहे. निष्ठेने वारीचे काम आणि वार्तांकन करणाऱ्या राज्यातील एकाच पत्रकाराला हा पुरस्कार दिला जात असल्याने या सन्मानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शहाजी फुरडे-पाटील हे गेली २० वर्षे लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथील रहिवासी असलेल्या फुरडे-पाटील यांनी कुटुंबाची वारकरी परंपरा भक्तिभावाने पुढे चालविली आहे. पत्रकारितेत कार्यरत असतानाच गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी पालखी मार्गावर प्रत्यक्ष फिरुन वारीचे सातत्यपूर्ण वार्तांकन केले आहे. या माध्यमातून वारकरी संप्रदाय, भागवत धर्माचा विचार आणि वारीतील सामाजिक व धार्मिक परंपरा वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.
आषाढी वारीदरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज तसेच आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. इंदापूर ते पंढरपूर, फलटण ते पंढरपूर तसेच मुक्ताई पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पालखी मार्गावरील धार्मिक-सामाजिक घडामोडींसह वारकऱ्यांच्या विविध मूलभूत प्रश्नांनाही त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. आषाढी एकादशी सोहळा, श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा आणि पंढरपूर शहरातील वारीचे वार्तांकनही त्यांनी सातत्याने केले आहे.
पहिल्याच वर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील विविध विषयांवर केलेल्या लेखनातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. वारीतील ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, विलास काटे, राजेंद्रकृष्ण कापसे तसेच राजाभाऊ चोपदार व पुंडलिक मोरे महाराज यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात श्रावण महिन्यात आयोजित जयवंत बोधले महाराजांच्या प्रवचनमालेवर “बोधवाणी” या सदरातून सलग पाच वर्षे त्यांनी लेखन केले. पंढरपूरहून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या पांडुरंगराय पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात बार्शी येथील दुपारच्या विसाव्याचे नियोजन आणि वारकरी सेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
यापूर्वी “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने सूर्यकांत भिसे (पुण्यनगरी), शंकर टेमघरे (सकाळ), मनोज मांढरे (प्रेस फोटोग्राफर), राजेंद्रकृष्ण कापसे (सकाळ) आणि सुनील लांडगे (महाराष्ट्र टाइम्स) यांचा गौरव करण्यात आला आहे.
वारीचे वार्तांकन आणि भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारातील दीर्घकालीन योगदानाबद्दल शहाजी फुरडे-पाटील यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान झाल्याने पत्रकारिता, वारकरी, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post Views: 11