किनवट – ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हक्काचा मार्ग मिळावा, यासाठी शासन ‘मातोश्री पांदण रस्ता योजना’ आणि ‘रोहयो’ अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, किनवट ते कोठारी (चि.) या दोन गावांना जोडणाऱ्या ऐतिहासिक ६६ फुटी पांदण रस्त्यावर भूमाफियांनी सरकारी पांदन रस्त्यावर चक्क प्लॉटींग पाडून विक्रीही केले आहे. तर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, हा रस्ताच आता शोधण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी तर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने मूळ रस्ताच गायब झाला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, शासकीय दप्तरी किनवट ते कोठारी या मार्गाची रुंदी ६६ फूट असताना, प्रत्यक्षात मात्र हा रस्ता कमालीचा अरुंद झाला आहे. विशेषतः किनवट आणि कोठारी या दोन्ही गावांच्या हद्दीत रस्त्याचे अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीच्या मालकांनी आणि बांधकाम धारकांनी रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून पक्की बांधकामे व टोलेजंग इमारती उभारल्या आहेत.
राज्य शासनाने ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या संकल्पनेतून पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. शेतमाल वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याचे अधिकार महसूल प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र, किनवट-कोठारी मार्गावरील या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. ६६ फुटी रस्ता केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे.
या पांदण रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे भविष्यात या भागातील विस्तार आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने या मार्गाची मोजणी करावी. अनधिकृतपणे उभारलेल्या टोलेजंग इमारती व बांधकामांवर कायदेशीर कारवाई करावी. ‘मातोश्री पांदण रस्ता योजने’च्या निकषाप्रमाणे हा रस्ता मोकळा करून त्याचे मजबुतीकरण करावे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर हा रस्ता कायमचा नकाशावरून पुसला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आता यावर महसुल प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















