देगलूर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दि. २९ मार्च रोजी रविवारी नांदेड दौऱ्यावर आले असता, युवासेना जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील देगावकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत निवेदन सादर केले.
बल्लूर फाटा ते मानूर (राज्यमार्ग १४५) तसेच देगलूर ते हाणेगाव (औराद मार्ग) आणि हाणेगाव ते शिळवणी या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांचे नव्याने मजबूत व टिकाऊ बांधकाम करण्यात यावे तसेच डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीट रस्ता करून सुरक्षित प्रवासाची सोय करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच या कामांसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देऊन निश्चित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होईल.
युवासेनेच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक व सार्वजनिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
सदर निवेदनावर युवासेना जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील देगावकर व ॲड. अंकुशराजे तुळशीराम जाधव आणि डॉक्टर व्यंकट धुमाळे, डॉ. मिलिंद शिकारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


















