सोलापूर – शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जंगी कुस्ती मैदानातील प्रमुख आणि सर्वात आकर्षणाची ठरलेली ‘देवाभाऊ केसरी’ ची मुख्य लढत महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख (कोल्हापूर) विरुद्ध अमृत पंजाब यांच्यात झाली. या लढतीत सिकंदर शेख याने निकाल डावावर अमृत पंजाबला पराभूत करत शानदार विजय मिळवला. महिलांच्या कुस्तीत कोल्हापूरची पैलवान सृष्टी भोसले हिने सांगलीच्या ऋतुजा जाधव हिच्यावर ‘एक चाक’ डावावर विजय मिळवला.
राजेंद्र चौकातील लाला आखाडा मैदानावर या कुस्ती स्पर्धेचे आयोजक संजय साळुंखे, महेश सरवदे आणि नगरसेवक युवराज सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कुस्ती सोहळा पार पडला. हे मैदान वडार समाज आणि जोशी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
या कुस्ती सोहळ्याला सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, ग्रामीण पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदी उपस्थित होते. या कुस्ती मैदानात समालोचक अशोक धोत्रे यांनी उत्तमप्रकारे सामन्यांची माहिती देत धावते समालोचन केले.
———–
रविराज सरवदे, सौरभ इगवे,यतिराज भोसले यांचीही बाजी
मैदानावरील अन्य कुस्तीमध्ये लाल आखाडा तालमीचा पैलवान रविराज महेश सरवदे याने गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान भागवत निरगुडे याच्यावर ‘दुहेरी पट’ काढून विजय मिळवला.
केगावचा पैलवान सौरभ मधुकर इगवे याने संदीप पाटील (आर्मी पुणे) याच्यावर ‘कलाजंग’ डाव करून विजय संपादित केला.
सोलापूर लाल आखाडा तालमीचा पैलवान यतिराज भोसले याने शंकर तिठे (जय हनुमान तालीम, वाडी बामणी) याच्यावर मात करत विजय मिळवला.
Post Views: 13