सोलापूर : महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकीदारांविरोधात सोलापूर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून थकीत भाडे न भरल्यामुळे ४ गाळे सील करण्यात आले. तसेच लॅन्ड फीच्या पथकाने एकही गाळा सिल न केल्याने संपूर्ण पथकातील ६ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
महापालिकेने गाळेधारकांसाठी ६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत अभय योजना–२०२६ लागू केली आहे. या योजनेत मेजर व मिनी गाळेधारक, खुली जागाधारक, अधिकृत खोकेधारक, बीओटी गाळेधारक, १५६ गाळेधारक तसेच टी.पी. ३/२३ अंतर्गत येणारे भाडेकरू यांना मार्च २०२६ अखेरची संपूर्ण थकबाकी आणि २०२६-२७ च्या सहामाहीचे भाडे एकरकमी भरल्यास १०० टक्के दंड व व्याज माफी मिळणार आहे.
महापालिका गाळे धारकांसाठी अभय योजना लागू करण्यात आली मात्र अद्यापही अनेक गाळेधारक थकबाकी भरत नसल्याचे दिसून येते. यामुळे भूमी मालमत्ता विभागाकडून गाळा सील करण्याची कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गाळे सील करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गतच विविध ठिकाणचे चार गाळे सील केले आहेत. आज मंगळवारी थकबाकी पोटी २ मिनी गाळे व २ मेजर गाळे सिल केले असून लॅन्ड फी चे पथकाने एकही गाळा सिल न केल्याने संपूर्ण पथकातील ६ कर्मचारी यांना प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे
दरम्यान, सोलापूर महापालिकेचे एकूण ७२६ मेजर गाळे असून त्यापैकी १६४ गाळेधारकांकडे थकबाकी आहे. महापालिकेच्या एकूण ६५६ मिनी गाळ्यांपैकी १५२ गाळेधारक हे थकबाकीदार आहेत. मिनी आणि मेजर असे दोन्ही मिळून एकूण १,३८३ गाळ्यांपैकी ३१६ गाळे धारकांकडे मोठी थकबाकी आहे. तसेच महापालिकेच्या एकूण ३८० खुल्या जागा आहेत. त्यापैकी २६७ जणांकडे लँड फीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आढळून येत आहे.
महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते व संबंधित समिती अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. भाड्यासह एसजीएसटी व सीजीएसटीची रक्कम ३१ जुलैपूर्वी भरल्यासच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. मुदत संपल्यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याने सर्व संबंधितांनी वेळेत थकबाकी भरून योजनेचा लाभ घेऊन कटू कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी केले आहे.
Post Views: 5