
सोलापूर – विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या दणदणीत विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणुकीची धावपळ संपताच आता जिल्हा परिषद प्रशासनाने आषाढी यात्रेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, राजेंद्र राऊत यांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करताना केदार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रभावी नियोजन आणि टीमवर्कच्या जोरावर यशस्वीपणे पार पाडली. या विजयात महायुतीतील आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकांचे प्रतिनिधी तसेच पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना बार्शी मतदारसंघातील निवडणूक व्यवस्थापनाची धुरा स्वतःकडे होती. या निवडणुकीत काम करताना अनेक अनुभव मिळाले असून आपल्या राजकीय कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची आणि समाधानकारक जबाबदारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
सभापती केदार यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचेही विशेष कौतुक केले. जिल्हा परिषद सदस्यांमध्ये एकजूट कायम ठेवून निवडणूक प्रक्रियेत समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केल्याचे ते म्हणाले.विधान परिषद निवडणुकीतील यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असला, तरी आगामी आषाढी यात्रेचे सुयोग्य नियोजन हीच जिल्हा परिषदेसमोरील खरी कसोटी ठरणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाची तयारी किती प्रभावी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
जिल्हा परिषदेचे आषाढी यात्रेसाठी नियोजन
विधान परिषद निवडणुकीचा अध्याय संपल्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासनाचे संपूर्ण लक्ष आषाढी यात्रेच्या नियोजनावर केंद्रित झाले आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असल्याने आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि ग्रामपंचायत विभागांवर मोठी जबाबदारी आहे
कोट
जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची समन्वय बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून, शनिवार दि. २७ जून रोजी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. यात्रेदरम्यान वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नियोजनाला गती देण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
Post Views: 13