सांगोला – गेल्या अडीच दशकांपासून सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या लोकमंगल समूहाचा प्रवास आता विश्वमंगल या जागतिक संकल्पनेच्या दिशेने सुरू झाला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून शुक्रवार दि.३ एप्रिल रोजी सांगोल्यातील रत्नागिरी-नागपूर हायवेवरील हॉटेल श्रीराम येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत माजी सहकार मंत्री आ.सुभाषबापू देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विश्वमंगल मराठी फाउंडेशनची ध्येयधोरणे स्पष्ट केली.
आ.सुभाषबापू देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, लोकमंगलने आजवर स्थानिक पातळीवर अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. मात्र, आता जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि विचारवंतांना एकाच व्यासपीठावर आणण्याची गरज आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि व्यावसायिक प्रगतीसाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशन हे एक प्रभावी माध्यम ठरेल. या फाउंडेशनची अधिकृत मुहूर्तमेढ दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आळंदी येथे रोवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या बैठकीस सांगोला तालुक्यातील ऍड.गजानन भाकरे, डॉ.रणजीत केळकर, माणिक भोसले, अमेय लोखंडे, दत्तात्रय पाटील, पुष्पलता मिसाळ, जितेंद्र बाजारे, भीमाशंकर पैलवान, प्रफुल साळुंखे, दत्तात्रय बाबर आणि प्रा.राजेंद्र ठोंबरे हे उपस्थित होते. या बैठकीदरम्यान उपस्थितांनी या जागतिक संकल्पनेचे स्वागत केले. सांगोला तालुक्यातील नागरिकांचा आणि विशेषतः तरुण उद्योजकांचा सहभाग या उपक्रमात कसा वाढवता येईल, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना जागतिक व्यासपीठाची जोड मिळाल्यास ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
















