सोलापूर – पावसाने पाठ फिरवल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून, अनेक भागांत २१ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सुमारे ६० टक्के तूट असून आतापर्यंत केवळ १९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्यासाठी केवळ शासकीय निकषांचा आधार न घेता जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणी जिल्हा परिषद कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी केली.
जिल्हा परिषदेत कृषी समितीची मासिक सभा सभापती चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पर्जन्यमान, खरीप पिकांची सद्यस्थिती, पीक कापणी प्रयोग, पीक विमा तसेच पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके आणि फळबागांवर झालेल्या परिणामांचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. फळबागांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणणे आवश्यक असल्याचे सभापतींनी सांगितले.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पंचनाम्यांचे निर्देश आणि नुकसानभरपाईसाठी प्रशासनाला दिलेली सूचना यामुळे कृषी समितीची बैठक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. या सभेस अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, समितीचे सदस्य, तालुकास्तरीय कृषी अधिकारी आणि कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते.
चौकट
पंचनामे करून नुकसानभरपाईची कार्यवाही करा
पावसाअभावी नुकसान झालेल्या पिके आणि फळबागांचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश सभापती चिवडशेट्टी यांनी प्रशासनाला दिले. पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही विलंब न करता युद्धपातळीवर पूर्ण करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
चौकट
गावोगावी पाणीटंचाईचे सावट
पावसाचा खंड वाढत असतानाच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा स्वतंत्र आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
चौकट
‘कागदी निकषांपेक्षा शेतकऱ्यांची व्यथा महत्त्वाची’
दुष्काळ जाहीर करताना केवळ कागदी निकष आणि आकडेवारीपुरता विचार न करता शेतकऱ्यांच्या बांधावरची परिस्थिती लक्षात घ्यावी. पर्जन्यमानातील तूट, पावसाचा दीर्घ खंड, पिकांची झालेली हानी आणि पाणीटंचाई या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी ठाम भूमिका चिवडशेट्टी यांनी मांडली.
चौकट
अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर अण्णा ढाणे नाराज
दरम्यान, शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा असलेल्या कृषी समितीच्या बैठकीला महावितरण, आत्मा आणि महाबीज विभागांचे संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याने समिती सदस्य अण्णा ढाणे यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित बैठकीला सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Post Views: 17