
सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत ‘मॉडेल क्रिकेट अकॅडमी ए’ संघाने ‘साऊथ सोलापूर रेड’ संघाचा १० गडी राखून एकतर्फी पराभवकरीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. घातक आणि किफायतशीर गोलंदाजी करणाऱ्या सुधान्व मणुर याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
साऊथ सोलापूर रेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मॉडेल अकॅडमीच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा हा निर्णय चुकला. साऊथ सोलापूरचा संघ ३१.४ षटकांत अवघ्या १३१ धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून विश्वनाथ मुंडे याने ४८ चेंडूंत सर्वाधिक ४२ धावा केल्या. मॉडेल अकॅडमीचा गोलंदाज सुधान्व मनूर याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत साऊथ सोलापूरच्या फलंदाजीचे कंबरडे पाडले. त्याने २४ धावा देऊन ४ महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याला कर्णधार अक्षय हावळे याने ९ धावात २ बळी मिळवून साथ दिली.
१३२ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मॉडेल क्रिकेट अकॅडमीच्या सलामीवीरांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. अवघ्या ९ षटकांत (५४ चेंडू) एकही गडी न गमावता १३५ धावा कुटून मॉडेल अकॅडमीने हा सामना अवघ्या काही वेळातच खिशात घातला. सलामीवीर विवेक अनची याने अवघ्या ३२ चेंडूंत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची स्फोटक नाबाद खेळी केली. तर कर्णधार अक्षय हावळे याने २३ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावांची धडाकेबाज नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.























