माहूर : नगरपंचायत माहूरचे नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांनी शहरातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांना आज माहूर भेटीत सादर करण्यात आले आहे.
नांदेडचे भूमिपुत्र आणि जिल्ह्याचे विकासपुरुष माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण आज दि. २९ मार्च रोजी माहूर येथे आले होते. यावेळी स्थानिक विश्राम गृहावर नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत सत्कार केला व विकास कामाच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,रणधीर पाटील, सुमित खडसे,हाजी उस्मान खां चांद खां यांची उपस्थिती होती.
माहूर हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या राज्यातील एक महत्त्वाचे ठिकाण असून येथे दरवर्षी लाखो भाविक देवदर्शनासाठी येत असतात. मात्र, शहरात आवश्यक त्या प्रमाणात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांसह भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकास कामांसाठी निधीची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यामध्ये माहूर शहराच्या हद्दीत मटण मार्केट बांधकामासाठी १ कोटी रुपयांचा निधी, तसेच नवीन वस्तीमध्ये वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी, अशी एकूण १ कोटी ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
या पूर्वीही नगराध्यक्ष दोसानी यांनी मटण मार्केटसाठी निधी मिळावा म्हणून पालकमंत्री यांच्याकडेदेखील मागणी केली आहे. तर स्थानिक आमदार भीमराव केराम यांना भेटून मटण मार्केट,वाढीव पाणीपुरवठा यासाठी शासनाकडून निधी मिळावा म्हणून पालकमंत्री यांच्याकडे शिफारस करण्याची मागणी करणार आहेत.


















