वैराग(प्रतिनिधी ):
‘एकता महिला मंच’ने नेहमीच सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रगतीला व सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिले आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, बार्शी तालुक्यातील ‘दहिटणे’ सारख्या अतिशय छोट्या गावातील आणि अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील कर्तृत्ववान महिला भगिनी सौ. लक्ष्मी सुतार यांची ‘एकता महिला मंच’च्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एकता महिला मंच’चे संस्थापक प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांना अधिकृत लेटर पॅडवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. या निवडीबद्दल सौ. लक्ष्मी सुतार यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गावच्या प्रश्नांसाठी लढणारे ‘धाडसी नेतृत्व’
सौ. लक्ष्मी सुतार यांनी आपल्या गावात राहून आजवर अनेक स्थानिक आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. केवळ आवाज न उठवता, त्यांनी ते प्रश्न अत्यंत हिंमतीने आणि यशस्वीपणे मिटवून दाखवले आहेत. केवळ एक सर्वसामान्य कुटुंबातील किंवा ग्रामीण भागातील महिला आहे म्हणून अशा कर्तृत्ववान महिलांना अनेकदा मुख्य प्रवाहातील संधी नाकारल्या जातात किंवा त्यांना टाळले जाते. परंतु, अशाच धाडसी महिलांना योग्य संधी देणे आणि त्यांचा आत्मसन्मान वाढवणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे, हाच मुख्य विचार करून ‘एकता महिला मंच’ने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
ग्रामीण भागातील नेतृत्वाला खंबीर पाठबळ
जोपर्यंत ग्रामीण भागातील अशा कर्तृत्ववान महिलांना योग्य संधी आणि खंबीर पाठबळ मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण पूर्ण होऊ शकत नाही, हाच विचार या निवडीतून दिसून येतो. एका अत्यंत सामान्य कुटुंबातील महिलेकडे सोलापूर जिल्ह्यासारख्या मोठ्या भागाची जबाबदारी सोपवणे, ही संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि मोठी बाब आहे. महिला सक्षमीकरणाचा खरा पाया ‘एकता महिला मंच’च्या माध्यमातून रचला जात आहे, हेच या ऐतिहासिक निर्णयावरून सिद्ध होते.
राजकारणाच्या पलीकडची सामाजिक चळवळ
या प्रसंगी बोलताना मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी सांगितले की,
“आमचे कार्य हे पूर्णपणे राजकारणाच्या पलीकडे जाऊन केवळ आणि केवळ सामाजिक बांधिलकीतून चालणारे कार्य आहे. कोणत्याही राजकारणाशी किंवा राजकीय पक्षाशी आमचा वैयक्तिक संबंध नसल्यामुळेच हे व्यासपीठ आणि ही चळवळ दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. या चळवळीशी प्रामाणिकपणे महिला जोडल्या जात आहेत. आगामी काळात महिलांचे विविध सामाजिक प्रश्न आणि त्यांचे अंतर्गत वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ‘महिला सक्षमीकरण’ काय असते, हे ‘एकता महिला मंच’ संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कार्यातून दाखवून देईल.”
आगामी काळात राज्यभरात विस्तार करण्याचा संकल्प
सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत केल्यानंतर, येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य पातळीवर अशाच प्रकारे ग्रामीण भागातील गरजू व कर्तृत्ववान महिलांना मोठी पदे दिली जाणार आहेत. महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना समाजात जोमाने काम करण्याची संधी देणे, हाच मंचचा मुख्य हेतू आहे.
लक्ष्मी सुतार यांच्या निवडीमुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात, बार्शी तालुक्यात आणि दहिटणे गावात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची व्याप्ती आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लक्ष्मी सुतार यांच्या या नवीन प्रवासासाठी आणि पुढील वाटचालीसाठी ‘एकता महिला मंच’ परिवार व सर्व स्तरांतून त्यांना मनःपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा!
Post Views: 25