मएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याच्या सुपुत्राने आपल्याच प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून शिवीगाळ व मारहाण करीत गाडीखाली चिरडल्याची घटना ठाण्यात घडली आहे. यावेळी प्रियकराने तिच्या हाताचा चावा घेतला. प्रेयसी फिर्यादी प्रिया उमेंद्र सिंग असे तरुणीचे नाव असून अश्र्वाजीत गायकवाड असे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीने आपल्या सोशल मीडियावर या बाबतची पोस्ट टाकल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. या घटनेत प्रिया गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घोडबंदर रोडवरील टायटन मेडिसिटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात प्रियकर अश्वजित गायकवाड, शिवीगाळ करणारा रोमिल पाटील आणि वाहन चालक सागर शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी प्रिया उमेद्र सिंग(२६) रा. १७०१, ए विंग, ललानी रेसिडन्सी, बाघबीळ, सुरज वॉटरपार्क समोर, जी.बी. रोड, ठाणे(प) हिचे एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजीत गायकवाड(३४) रा. रोडास् हिरानंदानी इस्टेट घोडबंदर रोड, ठाणे याच्याशी मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेयसी फिर्यादी प्रिया ही नवी मुंबईतील खारघर येथे बॉम्बे नेल कंपनी नावाचे सलून चालविते. तिला सादर सलून चालविण्यासाठी बहीण आणि भाऊ मदत करतात. काही कारणास्तव अश्वजीत गायकवाड याच्याशी बिनसले होते. त्याने ११ डिसेंबर, २०२३ रोजी प्रियाला फोन करून कोर्टयार्ड हॉटेल ओयळा या ठिकाणी बोलावले.
प्रिया भेटण्यासाठी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पोहचली. तेव्हा अश्वजीत याचा अबोला कायम होता. प्रिया कारमध्ये बसलेली होती. अर्ध्या पाऊण तासाने कारजवळ अश्वजीत याचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील, सागर शेळके त्याचा बॉडीगार्ड शिवा हे घटनास्थळी आले. तेव्हा अश्वजीतने प्रियाला शिवीगाळ करीत मारहाण केली. तर मित्र रोमिला पाटील यानेही तिला शिवीगाळ केली. झटापटीत अश्वजीतने प्रियाच्या डाव्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर अश्वजीत आणि त्याचे मित्र कार घेऊन निघताना प्रिया ही कारमधील तिची बॅग आणि मोबाईल घेण्यासाठी गेली असता तिला धक्का दिल्याने ती खाली पडली आणि रेंज रोव्हर कार खाली सापडली. प्रियकर अश्वजीत आणि मित्र गाडी वेगाने नेल्याने प्रियाच्या उजव्या पायावरून गाडी गेल्याने आणि तिची फरफट झाल्याने गंभीर अवस्थेत तिला टायटन मेडिसिटी खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सदरच्या घडलेल्या प्रकारानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याच्या आमदारांनी रुग्णालयात जाऊन प्रिया सिंग हीच जबाब नोंदवून प्रियकर अश्वजीत गायकवाड, शिवीगाळ करणारा रोमिल पाटील आणि वाहन चालक सागर शेळके यांच्या विरोधात भादंवि ३२३, २७९, ३३८, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस तिघांचा शोध घेत आहेत.