अतिक्रमणे तात्काळ हटवून नालेसफाईची कामे पूर्ण करा
सोलापूर : मान्सून पूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. अतिक्रमणे तात्काळ हटवून नालेसफाईची कामे पूर्ण करावीत. कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असेही आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने नालेसफाईच्या कामांना वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक ठिकाणी तातडीने उपाययोजना करा.कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी पी. एस. सावंत, कनिष्ठ अभियंता संजय पाटील, सूफियान पठाण, विष्णू कांबळे आणि प्राची मेटे उपस्थित होते. तसेच नगरसेवक अझर हुंडेकरी, अझर जाहीगीदार, बसवराज कैय्यकार आणि अनिसा मोगल यांनीही सहभागी होत परिसरातील विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी नाल्यांची सद्यस्थिती, गाळ काढण्याची प्रगती, पाणी निचरा व्यवस्थेची कार्यक्षमता तसेच स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांची माहिती घेतली. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
ब्रह्मदेव नगर आणि मुलतानी बेकरी परिसरातील नाल्यांची पाहणी करताना नाल्यांची उंची रस्त्याच्या पातळीशी सुसंगत ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता थेट नाल्यात जाईल. तसेच नाल्यांची इनवर्ट लेव्हल निश्चित करून त्याचे मार्किंग करण्याचे निर्देशही देण्यात आले.
नाला क्रमांक १३ व १४ तसेच अमन हॉटेल ते माजरेवाडी मार्गावरील नाल्यांजवळ झालेल्या अतिक्रमणांची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. ही अतिक्रमणे तात्काळ हटवून नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. अमन हॉटेल ते माजरेवाडी परिसरात स्ट्रॉम वॉटर लाईन असतानाही काही ठिकाणी नाले कोसळल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. यावर संबंधित ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रवींद्र नगर, ताई चौक (नाला क्र. १४) तसेच विजयनगर ते शोभानगर परिसरातील नाल्यांचीही पाहणी करण्यात आली. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना टाळण्यासाठी या भागांतील गाळ काढणे आणि नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. अर्कल यांच्या प्लॉट परिसरातील खाजगी मालमत्तेतून जाणाऱ्या नाल्यांचीही पाहणी करून त्याबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाईची कामे पूर्ण करून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी सांगितले.
सर्व नाल्यांची स्वतंत्र नोंदणी करा
शहरातील नकाशावरील आणि नकाशावर नोंद नसलेल्या सर्व नाल्यांची माहिती संकलित करून स्वतंत्र नोंदणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. भविष्यातील नाला विकास प्रकल्प, पाणी निचरा व्यवस्थेचे नियोजन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांतून निधी मिळविण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
Post Views: 8