बार्शी – नखाळी कादंबरीतील नायक हा आयुष्यात बदल घडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. तसेच दुःख, दारिद्रय अवहेलना या घटकांनी वेढलेल्या जगण्यातून नखाळी कांदबरीची निर्मिती झाली आहे, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात डॉ. सोमनाथ यादव लिखित नखाळी कांदबरीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक डॉ. महेंद्र कदम होते.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, हर्मिस प्रकाशनचे प्रमुख डॉ. सुशील धसकटे, लेखक डॉ. सोमनाथ यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे डॉ. शिंदे म्हणाले की, नखाळी कांदबरीत एका नाभिक समाजातील कुटुंबाची कहाणी चित्रित झाली आहे. या कुटुंबाच्या वाट्याला आलेले पराकोटीचे दुःख, राग, द्वेष, दारिद्रयातून आलेल्या संघर्षाचे चित्रण आपणास पाहायला मिळते. तसेच या पुस्तकात नाभिक समाजाचे वास्तवदर्शी चित्रण पहिल्यांदाच मराठी साहित्यात आले असून, ही कांदबरी महत्त्वाचा सामाजिक दस्तावेज आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना लेखक डॉ. महेंद्र कदम म्हणाले की, सदर कांदबरी ही सांस्कृतिक परंपरेची चिकित्सा करणारी आहे. वंचितांचा इतिहास या कादंबरीतून चित्रित झाला आहे. ही कादंबरी शोषण परंपरेची आठवण करुन देणारी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. रविकांत शिंदे यांनी केले, तर आभार डॉ. सदाशिव माने यांनी मानले.
Post Views: 19