सोलापूर : महापालिकेने यंदा सरासरी १७ टक्के पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट ठेवले असून ‘मिशन स्कॉलरशिप’च्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा टक्का वाढविण्यावर विशेष भर देण्यात येईल. इयत्ता पहिलीसाठी उत्कृष्ट शिक्षकांची नेमणूक करून सप्टेंबर २०२६ अखेर सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि संख्याज्ञान आत्मसात करून देण्याचा निर्धार व्यक्त करत शिक्षणाचा दर्जा उंचावणे, पटसंख्या वाढवणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे या उद्दिष्टांसह विविध महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षकांच्या सहविचार सभेत घेण्यात आले.
आगामी शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शिक्षकांची सहविचार सभा हरीभाई देवकरण प्रशाला येथील मुळे सभागृहात उत्साहात पार पडली. या सभेस महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर , प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक मनीष बांगर , रजनी राऊळ, निलोफर सय्यद यांनी विविध शैक्षणिक विषयांचा आढावा घेतला.
मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी शिक्षकांचे प्रश्न वेळेत मार्गी लावून त्यांना चिंतामुक्त वातावरण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे सांगितले. महापालिकेतील शिक्षकांची मंजूर पदसंख्या ७२२ वरून सध्या २२० पर्यंत घटल्याची बाबही यावेळी मांडण्यात आली.
महापालिकेने यंदा सरासरी १७ टक्के पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट ठेवले असून ‘मिशन स्कॉलरशिप’च्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा टक्का वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीसाठी उत्कृष्ट शिक्षकांची नेमणूक करून सप्टेंबर २०२६ अखेर सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि संख्याज्ञान आत्मसात करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.‘निपुण महाराष्ट्र’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मूलभूत शैक्षणिक पाया भक्कम करण्यावरही भर देण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, पटसंख्या वाढ आणि मूलभूत कौशल्यांवर भर देत महापालिका शाळांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सहविचार सभेस महापालिकेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका शाळांमध्ये इंग्रजी भाषेच्या अध्यापनासाठी विशेष उपक्रम : डॉ. जवळगेकर
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढणारे आकर्षण लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी भाषेच्या अध्यापनासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवीन वर्गखोल्या व इमारतींसाठी महापालिका अंदाजपत्रकात ३ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किरकोळ दुरुस्ती, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम तसेच शिष्यवृत्ती मार्गदर्शनासाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे, असे मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांनी समर्पण भावनेने काम करावे : मल्हारी माने
शिक्षकांनी समर्पण भावनेने काम करून गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांना कार्यालयीन कामकाजासाठी त्रास होऊ नये यासाठी सुलभ व्यवस्था निर्माण करण्यात येईल. पुढील काळामध्ये महापालिकेच्या शाळाकडे पाहण्याचा समाजाचा आणि पालकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी स्पष्ट केले.

























