सोलापूर – करमाळा तालुक्यातील सालसे येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलमधील सहशिक्षक श्री. गुंड विजयकुमार बाबुराव यांच्या ए.टी.डी. (शैक्षणिक चित्रकला) पदावरील नियुक्ती व वैयक्तिक मान्यतेच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार राजेंद्र बाजीराव वणवे यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सोलापूर यांच्याकडे केली आहे.
संबंधित शाळेच्या मंजूर सेवक संचामध्ये ए.टी.डी. पद उपलब्ध अथवा मंजूर नसल्याचा दावा वणवे यांनी केला आहे. ३० नोव्हेंबर २००९ रोजी वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला असता, सेवक संचात पद मंजूर नसल्याने मान्यता देता येणार नसल्याची नोंद करून नस्ती बंद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा कोणत्या आधारावर वैयक्तिक मान्यता देण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील आर्थिक बाबही गंभीर असल्याचे वणवे यांनी निदर्शनास आणले आहे. सन २०२०-२१ पर्यंत ३२ लाख ६९ हजार ८० रुपयांच्या वेतनवसुलीचा लेखापरीक्षण आक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच २०२०-२१ नंतर आजपर्यंत शासन निधीतून अदा झालेल्या वेतनाचीही स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मूळ वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, कार्यालयीन टिपण्या, सेवक संच, पदमान्यता व नियुक्ती आदेश, वेतन देयके, लेखापरीक्षण अहवाल आणि अनुपालन अहवाल तपासून सर्व अभिलेख सुरक्षित ठेवावेत, अशीही मागणी आहे.
दरम्यान, या प्रकरणी तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी राजेंद्र वणवे यांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, संस्था व्यवस्थापन अथवा इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोट
मंजूर पद नसताना वैयक्तिक मान्यता व वेतन अदा झाले असल्यास त्याची संपूर्ण प्रशासकीय व आर्थिक जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. शासनाच्या निधीचा प्रश्न असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार वसुली करून दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी राजेंद्र वणवे यांनी केली.
Post Views: 4