सोलापूर – अक्षय्य तृतीया सणानिमित्त हापूस आणि रत्नागिरी पायरी आंब्यांनी बाजारपेठ सजली असून आंब्याचे दर प्रति डझन १२०० ते १५०० रुपये इतके असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अक्षय्य तृतीया सणाला आंब्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
अक्षय्य तृतीया सणाला आंब्याला विशेष धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. या दिवशी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा नैवेद्य पूर्वजांना अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सणाच्या निमित्ताने आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत आंब्यांची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून दरातही काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकतो.
हापूसला पर्याय रत्नागिरी पायरी आंब्याचा
यंदा कोकणातील हापूस आंब्याची सोलापुरात आवक कमी आहे. त्याला पर्याय म्हणून रत्नागिरीचा पायरी आंबा बाजारात दाखल झाला आहे. अत्यंत सुवासिक असा आंबा त्याचे दर हजार रुपये प्रति डझन प्रमाणे आहेत. चविष्ट आणि गोड असलेला पायरी ग्राहकांना भुरळ घालत आहे. हापूसला पर्याय म्हणून आंबाप्रेमी पायरी आंब्याकडे वळालेले आहेत. सणानिमित्त जरी दरवाढ असले तरी, काही दिवसानंतर आंब्याचे दर कमी होतील असे चिन्ह आहेत.
बाजारात हापूस आंब्याची मोठी आवक येत आहे. हापुस आंब्याचे हे आकारानुसार असून कमीत कमी १२०० ते सर्वाधिक १५०० रुपये डझन आहेत. तर चार ते पाच डझन ची लाकडीपेटी सुमारे चार ते पाच हजार रुपयापर्यंत विक्री केली जात आहे. घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही दरामध्ये आंब्याची मागणी आहे.
– राजेश पाटील, फळ विक्रेते


























