सोलापूर – “‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ शासकीय अभियान नसून ती व्यापक लोकचळवळ व्हावी. लोकसहभागातून गावोगावी आरोग्याचा जागर निर्माण झाला, तरच आरोग्यसमृद्ध महाराष्ट्र घडू शकतो,” असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.
सोलापुरातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय येथे आयोजित ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष मधुकर पाटील, डॉ. निपुण विनायक, ई. रविंद्रन, डॉ. सुनील भोकरे, गजानन पाटील, डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड, डॉ. मारुती नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री आबीटकर म्हणाले, या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आरोग्यदायी जीवनशैली रुजविणे, हा या उपक्रमाचा गाभा आहे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य यंत्रणा तसेच आशा सेविका व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातूनच हे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
या अभियानांतर्गत एकात्मिक कार्यपद्धती आणि पारदर्शक मूल्यांकन प्रणालीद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून मानांकन देण्यात येणार असून त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कारही दिले जाणार आहेत.राज्य मंत्रिमंडळाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी या अभियानास मंजुरी दिली असून आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. आजपासून या अभियानाची औपचारिक अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागाचा आरोग्यदृष्ट्या चेहरा-मोहरा बदलण्यासोबतच जनसहभागातून आरोग्याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आबीटकर यांनी स्पष्ट केले.
“राज्यातील एकही नागरिक आरोग्य योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांसारख्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी,” असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, १४ वर्षे वयोगटातील सुमारे ९.८४ लाख मुलींसाठी कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू असून त्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वीरधवल जगदाळे यांनी पुणे जिल्ह्यातील ‘मॉडेल पीएचसी’ उपक्रमाचा उल्लेख करत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत रुग्ण कल्याण समित्यांची भूमिका अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली.
डॉ. निपुण विनायक यांनी अभियानाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, आरोग्य हा केवळ वैयक्तिक विषय नसून सार्वजनिक जबाबदारी आहे. त्यामुळे आरोग्य विषयक विविध योजना मोहिम स्वरूपात राबवून तळागाळातील समस्या सोडविण्यावर भर दिला जात आहे. भविष्यात हे अभियान शहरी भागातही विस्तारले जाणार आहे.
कार्यशाळेत ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे आणि गीताचे अनावरण करण्यात आले. तसेच जनजागृतीसाठी चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी अभियानाच्या पूर्वतयारीची माहिती सादर केली. या कार्यशाळेला पुणे विभागासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















