सांगोला – विधानसभा मतदारसंघातील पी.एम किसान योजनेपासून वंचित असलेल्या १३८७ शेतकऱ्यांना लाभ देण्याची तसेच महाडिबीटी द्वारे पेमेंट मध्ये असंख्य अडचणींमुळे शेतकरी विविध अनुदानांपासून वंचित राहत असून त्यावर तोडगा काढावा त्याचबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रॅक्टर अनुदाना पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी मागणी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन केली.
रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून होणारे लिंकींग त्वरित बंद करावे, शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित एच.टी.बी.टी कपाशी बियाण्यांवर बंदी घालावी, साथी पोर्टलचा वापर विक्रेत्यांवर सक्तीने न लादता तो उत्पादक व पुरवठादार कंपन्यांपर्यंत मर्यादित ठेवणे, खतांचा पुरवठा एफओआर पद्धतीने करण्यात यावा, बियाणे सॅम्पल फेल झाल्यास विक्रेत्यांना आरोपी न धरता साक्षीदार म्हणून मान्यता द्यावी, गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलची प्रलंबित रक्कम शासनाकडून तातडीने देण्यात यावी, खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व डीएपी खत वितरण पद्धतीचा फेरविचार करावा, शेजारील राज्यांतून येणाऱ्या अवैध व निकृष्ट दर्जाच्या कृषी इनपुट्सवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी केली.
कृषी मंत्री भरणे यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत, संबंधित विभागांना तपासणी करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकरी व कृषी व्यवसायिकांना दिलासा मिळेल अशा उपाययोजना लवकरच करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.























