वेळापूर – मळोली ता. माळशिरस येथील श्री संत तुकाराम महाराज यांचे आठवे वंशज श्रीगुरु वै. भागवत महाराज देहूकर यांचे पुण्यस्मरनार्थ अखंड हरिणाम सप्ताह प्रारंभ झाला असून पहिल्या दिवसाची किर्तन सेवा श्री संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह भ प प्रा ऋषिकेश महाराज देहूकर यांची संपन्न झाली. गेली अनेक वर्षापासून श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज मळोली ता. माळशिरस या ठिकाणी वास्तव्य करीत असून मळोली व परिसरातील भाविकांनी त्यांना गुरुस्थानी मानले असून त्यांची मळोली गावात सद्य स्थितीत अकरावी पिढी किर्तन परंपरेच्या माध्यमातून संतांचे विचार समाजात मांडत आहेत.
आज पहिल्या दिवशी किर्तन सेवेत ह भ प प्रा ऋषिकेश देहूकर म्हणाले की देहूकर फडावर सप्ताहच्या पहिल्या दिवशी
समचरण दृष्टी l विटेवरी साजिरी ll या अभंगावर किर्तन करण्याची प्रघात असून या अभंगामध्ये देवाचे मंगलाचरण सांगितले आहे, शास्त्रात याचे तीन मुख्य विचार दिसून येत असून प्रथम इष्ट प्राप्ती, द्वितीय अनिष्ट निवृत्ती व तृतीय परंपरेचे सातत्य. साधू संतांनी परंपरेचे सातत्य टिकविण्यासाठी मंगलाचरण केले.
श्री संत तुकाराम महाराज या अभांगद्वारे सांगतात की, भगवंताच्या चरणावर आपली दृष्टी स्थिर रहावी व आपल्या वृत्तीमध्ये भगवंताचे वास्तव्य रहावे. ही मागणी करताना यासाठी आड येणारे अथवा प्रलोभण दाखवणारे मायेच्या रूपातील अडथळे येऊ देऊ नकोस अशी विनंती ते देवाला करतात. आणि हे प्राप्त करण्यासाठी देवाने आम्हास ब्रम्हदिक पद दिले तरी त्या ठिकाणी माझी वृत्ती उदासीन व उदविग्नता दाखव. आणि हे भक्तीचे वर्म तुकाराम महाराज यांना समजलेलं आहे. संतांच्या विचाराने समाजाची शुद्धी होते.मात्र ते विचार अंगीकार करून आत्मसात केले पाहिजेत.
आज तरुण युवकांना गाथा, ज्ञानेश्वरी यांचे चिंतन करून आपल्या विचारांची क्षमता वाढविणे महत्वाचे आहे.संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून विचारांचा जागर करून समाजास अंधःकारातून बाहेर काढले. त्यासाठी त्यांना स्वतःस अगोदर त्रास सहन करावा लागला.गावोगावी ज्ञानेश्वरी व गाथा पारायण झालेच पाहिजे असे मत ह भ प प्रा. ऋषिकेश देहूकर यांनी व्यक्त केले.
























