सोलापूर : ईद-उल-अझहा ( बकरी ईद ) साजरी करण्यासाठी आपल्या गावी आलेल्या एका तरुणाचा रस्ता कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून आणि मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना सोलापूर-होटगी मार्गावर सोलापूर ते होटगी मार्गावरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ २७ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास
घडली .
मोहम्मद हनीफ सत्तार नदाफ ( वय ५०, रा. बालवाडी, मुरारजी नगर, पवई, मुंबई सध्या. होटगी, दक्षिण सोलापूर) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे.
यातील मयत हनीफ नदाफ हे आपल्या मोटार सायकल वरून बुधवारी रात्री जात असताना होटगी गावाजवळील रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. सकाळी हा रस्ता सुरू होता, मात्र रात्री अचानक तो बंद करण्यात आला होता. तेथे रस्ता बंद असल्याचे कोणतेही सूचना फलक, सिग्नल किंवा ट्रँगल लावलेले नव्हते. रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे हनीफ यांनी तिथे थांबून विचारणा केली की, “तुम्ही अचानक कोणताही बोर्ड न लावता रस्ता कसा काय बंद केला?”. यावरून तेथील कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. यातच हनीफ यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. या झटापटीत हनीफ यांच्या छातीत जोरात बुक्की मारली. ते जागीच खाली बसले आणि त्यांना चक्कर येऊ लागली. यामुळे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर तातडीने येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी मयताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे .
चौकट –
दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही – नातेवाईकांची भूमिका
दरम्यान या घटनेमुळे मयत हनीफ नदाफ यांच्या नातेवाईकांनी कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत संबंधित कंत्राटदार आणि मारहाण करणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत आपला संताप व्यक्त केला .मृत हनीफ नदाफ यांच्या पश्चात आई , पत्नी, तीन मुली, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली
Post Views: 16