बार्शी – मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा टिकवणे आपल्याच मराठी माणसांच्या हाती असून, त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने अंतःकरणापासून मराठी भाषेचा अवलंब करायला हवा, असे मत ज्येष्ठ समीक्षक, भाषा अभ्यासक डॉ. राजशेखर शिंदे यांनी प्रतिपादन केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि मराठी विभागाच्यावतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ‘मराठी भाषा : अभिजात परंपरा’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख होते.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, माजी प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे, प्राचार्य डॉ. अशोक कदम, मराठी विभाग प्रमुख डॉ. बिरा पारसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, कोणतीही भाषा मानवी विकासाचे अनेक मार्ग खुले करीत असते. स्वभाषाच इतर भाषांपर्यंत जाण्याचा भक्कम आधार असतो. मराठीच्या अभिजात दर्जामुळे पुढे अनेक वर्ष मराठी समृद्ध होत राहील, पण त्यासाठी श्वासाइतके आपल्याला मराठीवर प्रेम करता यायला हवे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी मराठी भाषेमुळे ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडून येत आहेत. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी मनोभावे प्रयत्न करावेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्ता घोलप यांनी केले. प्रमुख पाहण्यांची ओळख डॉ. रविकांत शिंदे यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर गरड यांनी तर आभार प्रा. भरत जसाभाटी यांनी मानले.
Post Views: 9