सोलापूर – शहरातील आरोग्य प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी महिलांचे संघटन अत्यंत महत्त्वाचे असून, यामध्ये महिला आरोग्य समित्या (मास) केंद्रस्थानी आहेत. मासचा योग्य आणि सक्रिय वापर झाला तर शहर पातळीवरील आरोग्य सेवा अधिक सक्षम होऊ शकतात, असे मत साथी संस्थेच्या शकुंतला भालेराव यांनी व्यक्त केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनुसंधान ट्रस्ट ‘साथी’ संस्था आणि अस्तित्व संस्था, सोलापूर यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विडी घरकुल, रामवाडी, जिजामाता आणि दाराशा या चार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील 50 महिला आरोग्य समिती सदस्यांचे सक्षमीकरण आणि सक्रिय करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी महिला आरोग्य समित्यां संदर्भात आशांचे प्रशिक्षण समाजकल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आला होते.
अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, महिला आरोग्य समित्या सक्रिय झाल्यास शहर पातळीवरील अनेक प्रश्न सोडवणे अधिक सुलभ होईल.
अनुसंधान ट्रस्ट ‘साथी’ संस्थेचे विनोद शेंडे यांनी बोलताना सांगितले की, महिला आरोग्य समित्या या स्थानिक समुदाय आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. शहरी भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मासची भूमिका निर्णायक आहे. आपल्या भागातील आरोग्य सेवांतील अडचणी मासच्या माध्यमातून संघटितपणे मांडल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. “आपले आरोग्य चांगले राहिले तर समुदायाचे, समाजाचे आणि शहराचेही आरोग्य चांगले राहील,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी तब्बू नगारे यांनी महिला आरोग्य समित्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी वडणे यांनी केले.

























