सोलापूर – जिल्ह्यावर दुष्काळाची गडद सावट असताना परतीच्या पावसाने दुसऱ्या दिवशी सलग हजेरी लावली आहे. परंतु हा अत्यल्प पाऊस असल्याने शेतकरी अद्यापही चिंताग्रस्त आहे. सोलापूर जिल्ह्यावर यंदा खूपच कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एल निनो च्या प्रभावामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट उडवले आहे. पावसाळा संपत आला तरीही यावर्षी सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांचे खरीपाचे पीक हाता तोंडातून गेल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अपेक्षेप्रमाणे परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली असली तरी पडलेला पाऊस हा अगदी अत्यल्प आहे. खरीप हातून गेल्याने शेतकऱ्याची सर्व भिस्त आता रब्बी हंगामावर आहे. पण पुढील पंधरा ते वीस दिवस असाच दररोज पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तरच रब्बी पिकाच्या बाबतीतील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होणार आहेत. पण परतीचा पाऊस पुढे काही दिवस पडेलच अशी खात्री नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. हा पाऊस सलग काही दिवस पडल्यास जनावरांसाठी चारा निर्माण होण्यास थोडीफार मदत होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्यात येत असल्याने ते शेतकऱ्यांसाठी दुष्काळी मदत जाहीर करतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 9