सोलापूर -अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअर बाजारात आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यास लावून शहरातील एका ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४४ लाख ७८ हजार रुपयांची सायबर फसवणूक प्रकरणी अनोळखी मोबाईलधारक व बँक खातेदारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रुचिका विशॉ नावाची मोबाईल धारक व्यक्ती व बॅक खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत प्रविण देवीदास दासरी (रा. न्यू सुनिल नगर, एमआयडीसी सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही फसवणूक १६ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन घडली आहे.
यातील फिर्यादी हे पुणे येथील एका कंपनीत “वर्क फ्रॉम होम’ करत असताना, त्याला इन्स्टाग्रामवर एका अनोळखी आयडीवरून मेसेज आला. त्याला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर रुचिका विशॉ नावाच्या संशयित व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. व एका बनावट ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास लावले. सुरुवातीला तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी ४,००० रुपयांचा परतावा त्याच्या खात्यात जमा केला.त्यानंतर नफ्याचे मोठे आमिष दाखवून युनिटी स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ इंडिया यांसारख्या विविध खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ४४ लाख ७८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. ॲपवर तरुणाला तब्बल २.३१ कोटी रुपयांचा काल्पनिक नफा दाखवण्यात आला. मात्र, रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी जबरदस्तीने आयपीओ ऑलॉटमेंटचे कारण सांगून आणखी पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन “१९३०’ वर तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक ढवळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 7