सांगोला – म्हैसाळचे पाणी पारे तलावात व पाणीपुरवठा विहीर क्षेत्रामध्ये सोडून नागरिकांची तहान भागविली जावी अशी मागणी पारे गावचे माजी सरपंच संतोष पाटील यांनी अंतिम निवेदनाद्वारे केली असून पाणी न सोडल्यास सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान संबंधित विभागाला कळवून कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार बाळूताई भागवत यांनी संतोष पाटील यांना यावेळी दिले.
सांगोला तालुक्यातील पारे परिसरामध्ये पाऊस न झाल्याने पेरणी केलेल्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तसेच गेल्या दोन महिन्यापासून पारे परिसरात बोअर आटले आहेत. विहिरींना कणभर पाणी नाही. त्यामुळे पिण्यासाठी ही कोठे पाणी नाही. अशी परिस्थिती असताना म्हैसाळ विभागाला किमान पिण्यासाठी तलाव व पाणीपुरवठा विहीर परिसरात पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पारे तलावात शासनाचे टंचाई मध्ये पाणी सोडण्याचे आदेश असताना देखील तो आदेश धाब्यावर बसवून अधिकारी यांची हुकुमशाही चालू आहे, असे संतोष पाटील यांनी यावेळी सांगितले.