अक्कलकोट : सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट येथील प्रा. मयूर स्वामी यांचा “श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट : आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून सामाजिक-आर्थिक परिणाम आणि विकसित भारत २०४७ साठीच्या संधी” या विषयावरील संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-परिषदेत प्रकाशित करण्यात आला आहे.
सर्वोदय शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, उमदी (जि. सांगली) व ग्लोबल फाउंडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “टुरिझम डेव्हलपमेंट इन इंडिया : प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स इन व्ह्यू ऑफ विकसित भारत २०४७” या एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत हा संशोधन निबंध सादर करण्यात आला.
या संशोधनामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामुळे अक्कलकोट परिसरात निर्माण झालेल्या आध्यात्मिक पर्यटनाच्या सामाजिक व आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या अनुषंगाने अक्कलकोटच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध संधी, रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत पर्यटनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या संशोधन निबंधामुळे अक्कलकोटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून असलेले महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. बसलिंगप्पा खेडगी, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, प्राचार्य गुरुलिंगप्पा धबाले, डॉ. आबाराव सुरवसे, प्रा. संतोष वगाले आणि महेश स्वामी आदींनी अभिनंदन केले.