सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील आदिला नाला परिसरालगत राहणाऱ्या हजारो नागरिकांवर ओढवलेल्या रेड व ब्ल्यू लाईनच्या संकटाबाबत तातडीने हस्तक्षेप करून बांधकाम परवानग्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात चंदनशिवे यांनी म्हटले आहे की, सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव ते देगाव परिसरादरम्यान सुमारे १४ किलोमीटर लांबीच्या आदिला नाला परिसरातील हजारो प्लॉटधारक व नागरिकांचे भवितव्य सध्या अनिश्चिततेत सापडले आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचले होते. मात्र, यासाठी नाल्यांची अपुरी साफसफाई, रुंदीकरणाचा अभाव तसेच रेल्वे मार्गाजवळ निर्माण झालेला पाण्याचा अडथळा कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महानगरपालिका प्रशासन स्वतःच्या नियोजनातील त्रुटी झाकण्यासाठी या परिसरावर रेड व ब्ल्यू लाईनचे निर्बंध लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा चुकीचा वापर करून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
चंदनशिवे यांनी डीपी प्लॅनमधील विसंगतीकडेही लक्ष वेधले. २०२१ च्या विकास आराखड्यात तसेच २०४३ च्या प्रस्तावित विकास आराखड्यात आदिला नदीचा उल्लेख नाला म्हणून करण्यात आला असून रेड किंवा ब्ल्यू लाईनचा कोणताही उल्लेख नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गाव नकाशे, मोजणी नकाशे आणि अन्य शासकीय दस्तऐवजांमध्येही या प्रवाहाची नोंद नाला अशीच असताना अचानक नदीचे निकष लागू करून निर्बंध लादणे योग्य नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या लेआऊटमधील अनेक नागरिकांनी बँक कर्ज घेऊन घरे बांधली किंवा प्लॉट खरेदी केले आहेत. अशा परिस्थितीत बांधकाम परवानग्या रोखल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नागरिकांच्या वतीने रेड व ब्ल्यू लाईनचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, २०४३ च्या विकास आराखड्यानुसार बांधकाम परवानग्या पूर्ववत सुरू कराव्यात, आदिला नाल्याचे शास्त्रीय पद्धतीने खोलीकरण व रुंदीकरण करावे आणि गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सर्व बांधकाम परवानग्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. या प्रश्नामुळे हजारो कष्टकरी कुटुंबांची आयुष्यभराची कमाई अडकली असून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी चंदनशिवे यांनी केली.
यावेळी ओएसडी आनंद रामटेके तसेच इथॉस रियालिटीचे संचालक तुकाराम गायकवाड उपस्थित होते.
Post Views: 6